|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
माननीय पंडित भीमसेन जोशी
यशंवतराव चव्हाण मराठी साहित्य संस्कृति /कला, क्रीडा राज्यस्तरीय पारितोषिक २००५
सन्मानपत्र आपल्या बुलंद गायकीमुळे ज्यांचे नांव भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात गेली ५० वर्षाहून अधिक काळ निनादत आहे असे गायक पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी धारवाड जिल्ह्यातील रोण या ठिकाणी झाला. आई रमाबाईने गायिलेली अंगाई गीते आणि भजने हा त्यांच्यावर झालेला पहिला सांगीतिक संस्कार. त्यांचे वडील श्री. गुरूराज भीमाचार्य जोशी यांनी लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन पैसाफंड जमविण्यासाठी स्वदेशी चळवळीत भाग घेतला. पुण्याच्या फर्गसन कॉलेजांतून त्यांनी संस्कृतमध्ये पदवी प्राप्त केली व नंतर नोकरी करीत असतांना त्यांनी संस्कृत विषयात एम्.ए.ची पदवी मिळविली. त्यांनी कानडी व इंग्रजी भाषेत लक्षणीय ग्रंथरचना केली व ‘पॅसेज टू इंडिया’ व ‘ऍना कॅरेनिना’ यासारख्या जगप्रसिद्ध ग्रंथांचे अनुवाद केले.
|