|
भूमिका
महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे विचार व
कार्यापासून प्रेरणा घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही
संस्था १९८५ पासून कार्यरत आहे. आजवरच्या वाटचालीत अनेक क्षेत्रात
या संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजातील विविध
घटकांच्या विकास कार्याला योग्य दिशा मिळावी आणि त्याची
परिणामकारकता वाढावी यासाठी संस्थेच्या विविध विभागांमार्फत कार्य
सुरू आहे. समाज व शासनाच्या विविध घटकांमध्ये संवाद व
समन्वयातून प्रत्यक्ष कृतिशीलतेकडे वाटचाल व्हावी, असा
सातत्यपूर्वक संस्थेचा प्रयत्न असतो.
गेली वीस वर्षे महाराष्ट्रातील युवांसोबत नवमहाराष्ट्र युवा
अभियान हा प्रतिष्ठानचा विभाग याप्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न
करीत आहे. त्यातून अनेक उपक्रम पुढे आले आणि अनेक कार्यकर्तेदेखील
घडले. मात्र, तेवढे पुरेसे नाही हे लक्षात घेऊन समाजातील सर्वांत
जास्त संख्येने असणार्या युवांना त्यांची स्वतंत्र ओळख देणे आणि
त्यांच्या विकास व हक्कांसंबंधात शासनाने स्वतःचे धोरण निश्चित
करणे याची अत्यंत आवश्यकता जाणवत होती. या दृष्टीने जानेवारीपासून
अभियानाने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरणाची चर्चा
सुरू केली. त्यासाठी महाराष्ट्रातील युवांसोबत कार्य करणार्या
विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांसमवेत संवाद सुरू केला.
महाराष्ट्रात १३ ते ३५ वर्षे वयोगटातील युवांची संख्या ४२ टक्के
आहे. अशा मोठ्या गटासाठी सरकारी, निमसरकारी संस्था तसेच शिक्षण
संस्था विविध विभांमार्फत वेगवेगळे उपक्रम व योजना राबविल्या जात
आहेत. युवा वर्ग स्वतः पुढाकार घेऊन युवा मंडळे, संस्था, संघटना
स्थापन करीत आहे आणि आपल्या विकासाच्या नवनवीन क्षेत्रांचा शोध
घेत आहे. अशा विविध कार्यक्रमांना दिशा देणे तसेच त्यात सुसूत्रता
आणण्याची गरज समोर येत आहे. अशा वेळी सम्यक व समग्र युवा धोरण
शासनाकडून व समाजाकडून युवांना त्यांच्या विकासासंदर्भात आश्वासन
देऊ शकते.
|