यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

 राज्यस्तरीय पारितोषिक

यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य, संस्कृती/कला-क्रीडा राज्‍यस्‍तरीय पारितोषिक २००९ श्रीमती किशोरी आमोणकर यांना देण्यात येणार.

यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठानतर्फे दरवर्षी चक्रीय पद्धतीने कृषी औद्योगिक समाजरचना/व्‍यवस्‍थापन प्रशासन, सामाजिक एकात्‍मता/विज्ञान तंञज्ञान, ग्रामीण विकास/आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृति/कला-क्रीडा या क्षेत्रांमध्‍ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्‍यक्‍तीस/संस्‍थेस यशवंतराव चव्‍हाण पारितोषिक देण्यात येते. रोख रक्‍कम रुपये २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

यावर्षी हे पारितोषिक मराठी साहित्य संस्कृति/कला-क्रीडा या क्षेत्रासाठी द्यावयाचे आहे. या क्षेत्रामध्‍ये लक्षणीय कार्य करणार्‍या व्यक्‍ती अगर संस्था यांच्याविषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करून पारितोषिक निवड समितीने श्रीमती किशोरी आमोणकर यांची या वर्षीच्या मराठी साहित्य संस्कृति/कला-क्रीडा पारितोषिकासाठी निवड केलेली आहे.

श्रीमती किशोरी आमोणकर यांनी गेली अनेक वर्षे आपल्या गायनाने देशातील व परदेशातील श्रोत्‍यांना व जाणकारांना मंत्रमुग्‍ध केले आहे. तसेच त्यांनी संगीतविषयक क्षेत्रामध्‍ये मूलभूत व सैद्धान्तिक स्‍वरुपाचे विवेचन करणारा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध करून मराठी साहित्‍यातही मोलाची भर घातली आहे.

या क्षेत्रांतील असाधारण कर्तृत्व लक्षांत घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्‍यातिथीच्‍या दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर,२००९ रोजी वाय्.बी.चव्‍हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्‍ये प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष व भारताचे कृषीमंत्री नामदार शरद पवार यांच्या हस्ते श्रीमती किशोरी आमोणकर यांना देण्यात येणार आहे.

मागील पान

मुख्य पान